अध्यक्षीय भाषण
कसं असतं मूल ?
चंचल अबोध अजाण
निष्पाप निरागस
नाहीत प्रश्न ना समस्या
ती आहेत विविध फुलावर
उडणारी फुलपाखरे
बालपण असतं आनंदाचं उधाण
निखळ भावनेचं निखळ स्फुरण
स्वप्नांची दुनिया त्यांची
असीम आकाशाला गवसणी घालणारी
क्षितिजा पलीकडले गगन कवेत घेणारी
मन पाखरू सतत भिरभिरणारी !
फुलांसारखं फुलताना त्यांचं बालपण आपणास जपता आले पाहिजे. त्यांच्या चंचल, अस्थिर मनाला बांध घालून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम आपणास करता आले पाहिजे. त्याच्या अवयवांना, हातांना, पायांना, डोळ्यांना, कानांना सजग करता आले पाहिजे. विश्वातील पंच महाभूतांच्या तत्वातून त्यांचा जन्म झाला त्या पंचमहाभूतांना ओळखण्यासाठी त्यांची पंचेंद्रिये जागृत, सजग करता तर आलीच पाहिजेत. पंचेंद्रियांद्वारे बालकांच्या शिक्षणाची सुरवात होते. ते जे पाहतात, ते जे ऐकतात, ते जे अनुभवतात, ते ज्याचा वास घेतात, ते ज्याला स्पर्श करतात त्या त्या इंद्रियांना विकसित करण्याचे आपले काम आहे. डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, जिभेने अनुभवतो, स्पर्शाने जाणतो, त्यातून शिकत असतो. अनुकरण करत असतो. आकलन करत असतो. चिंतन, विचार करत असतो. मनन करत असतो. त्यातून तो शिकत असतो. प्रत्येक अनुभवाचा अर्थ लावत असतो. त्या अनुभवाचे प्रकटीकरण करत असतो.
खर तर बालकाच्या शिक्षणाची सुरवात त्याच्या जन्मापासून सुरु झालेली असते. मूल आईच्या गर्भात असल्यापासून बाहेरच्या जगातील अनेक गोष्टीचे त्याचे शिक्षण चालूच असते. जेव्हा ते बाह्य जगात प्रवेश करते तेव्हापासून ते अधिक तीव्रतेने सर्व गोष्टी, आवाज, आकार, स्पर्श, रंग, गंध इत्यादी गोष्टी अनुभवू लागतो. त्याचे मन तर्क करते. अर्थ लावते. अन्वय लावत असते. उदा. बघा बाळाला भूक लागली ते रडायला लागते, कुठे त्याचा हात अडकला पाय अडकला रडायला लागते, झोप आली रडेल, मोठा आवाज झाला घाबरेल, रडू लागेल. पायाला चटका बसला रडेल. हळूहळू त्याच्या सर्व गोष्टी सुरवातीला रडण्यातून व्यक्त होतात.
हळूहळू त्यांचे शिक्षण सुरूच असते. त्याचा अनुभवाचा साथ वाढत असतो. वय वर्ष तीन झाले की मुलाचे आई वडील त्याला बालवाडीत / नर्सरीत पाठवतात. तत्पूर्वी शाळेत जाण्यासाठी त्याच्या मनाची तयारी आई वडिलांना करावी लागते. शाळा, परिसर, शिक्षिका, मुले हे सारे त्याला नवीन असते. आतापर्यंत आई, वडील, स्वतः च्या कुटुंबातील व्यक्ती, घर, परिसर हे सर्व परिचित असलेले सोडून नव्या विश्वात, नव्या जगात, पाऊल टाकताना ते भ्यालेले, घाबरलेले असते. अनोळखी जग, शिक्षिका, शाळा, मुले बदललेले वातावरण सर्व बघून त्याचे मन हा सर्व बदल चटकन स्वीकारत नाही.
अश्यावेळी मुलाचे आई वडील व शिक्षिका यांची भूमिका फार महत्वाची असते. त्याचे भावविश्व त्याचे संवेदनशील मन यावर कोणताही ओरखडा उमटता कामा नये याची काळजी घ्यावी लागते. विविध परीने ते शाळेत रमेल यासाठी प्रयत्न करावे लागतात.
येथूनच बालशिक्षणाची खरी सुरवात होते, नव्याने बालवाडीत आलेली मुले नवीन वातावरणामुळे बुजतात, घुमी होतात. नाहीतर मोठयाने रडतात. आईचा पदर सोडत नाहीत घरी जाण्यासाठी हट्ट धरतात. वर्गात बसत नाहीत. अशावेळी आई व शिक्षिका दोघीने त्याला बोलून शांत करणे, विविध खेळणी खेळण्यासाठी देणे, गाणे ऐकवून, चित्र दाखवून शांत करावे लागते. आता तर दूरदर्शन, सिडी प्लेअरवर अनेक चित्रे, पक्षी, प्राणी, दाखवून त्याला रामविता येते. बालवाडीतील शिक्षण म्हणजे गाणी, गप्पा, गोष्टी, चित्रे, खेळ, गाणी, बडबडगीते हे असले पाहिजे.
इथे पालकांनी किंवा शिक्षिकांनी त्यांच्या हाती पती पेन्सिल किंवा लेखन साहित्य अजिबात देऊ नये. अंकाची गाणी, प्राण्याची गाणी, अक्षरांची गाणी अशा विविध गाण्यातून त्यांचे कान ऐकण्यासाठी तयार करावे लागतात. विविध प्रकारचे आवाज ऐकवणे ते ओळखण्यास सांगणे जेणेकरून ते सांगू लागतील भूभू, मनीमाऊ, रिक्षा, बस, पाऊस, चिवचिव, हे ओळखण्यातील गंमत त्यांना समजते. ते आवाजाचा अनुभव घेऊ लागतात. त्याच्यासाठी विविध प्राणी, पक्षी, वस्तू, वाहने, झाड, फुल आदी वस्तूंची चित्रे, दाखवून त्यांना नजरेने ते ओळखण्यासाठी प्रवृत्त करावे लागते.
चित्रांद्वारे विविध अभिनय गोष्टी, नादानुकारी शब्द शिकवावे लागतात. प्राण्याचे घर, पक्ष्याचे घर त्यांची पिले दाखवून गोडी निर्माण करावी लागते. विविध खेळगाणी घ्यावी लागतात. विविध विषयावर त्यांच्याशी गप्पा माराव्या लागतात. आज आईने डब्यात काय दिले? घरी कोण कोण आहे. नवा ड्रेस कोणी दिला? कोणत्या गावाला गेला होता अशा विविध विषयावरील प्रश्नोत्तरातून मुले बोलू लागतात. शिक्षिकेचा व त्यांचा सुसंवाद सुरु होतो. शिक्षिकेविषयी विश्वास वाटू लागतो. ती आपली कोणीतरी जवळची आहे. आपल्यावर माया करते, जवळ घेते. घास भरवते मला ती रागवत नाही असा मुलांना विश्वास वाटू लागतो. येथूनच बालशिक्षणाला सुरवात होते. त्याचे मन नवे नवे ग्रहण करण्यासाठी तयार होते. शाळेची शिक्षिकेची गोडी लागते. घरी जायला तयार होत नाहीत.
लहान मुलासाठी आपण उगवणाऱ्या रोपट्याची उपमा देतो. नव्याने अंकुरणाऱ्या रोपट्यासाठी अनुकूल वातावरण लागते. चांगली सकस माती उगवू जमीन तिच्यात योग्य खत, पाणी, हवा, मोकळे वातावरण ऊन याची गरज असते. अशा मातीत बी रुजवले तर त्याची वाढ योग्य पद्धतीने होते. त्याला ऊन, वारा, पाऊस याची मदत होते. तशीच गोष्ट या लहान मुलाच्या बाबतीत असते. घरचे अनुकूल वातावरण भोवतालचा परिसर योग्य संस्कार आणि शिक्षण यातून मुले घडत असतात. त्यांच्या मनाचा बुद्धीचा कारकांचा विकास होत असतो. ती सक्षम, संस्कारक्षम संवेदनशील बनतात.
वय वर्षे १-३ व ३ ते ५ या संस्कारक्षम असणाऱ्या मुलाच्या मनाचा, त्यांच्या शरीरवाढीचा विचार बालशिक्षणात जरूर व्हावा. या वयातले संस्कार त्याच्या भावी आयुष्याची भक्कम शिदोरी असते. भक्कम पाया असेल तर मजबूत इमारत उभी राहते. वारा वादळ संकटाना ती तोंड देते. मुलाच्या भावी आयुष्यातील वारा वादळांना, संकटाना, समस्यांना तोंड देण्यासाठी भावी पिढी बालशिक्षणाव्दारे घडवू या !
वरील विचाराप्रमाणे मुक्तांगण प्रायमरी स्कूल व पेंग्विन किड्स प्रि-प्रायमरी स्कूलची वाटचाल चालू आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक विकासासाठी अभ्यासक्रमाची रचना केली जाते. अभ्यासक्रमानुसार व शाळेच्या उद्दिष्टानुसार विविध उपक्रम, खेळ, गाणी, भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात. शाळेत विद्यार्थ्याने पाऊल ठेवल्यापासून प्रार्थना, परिपाठ, सुविचार, बोधकथा, संवाद, परिचय, थोरांची ओळख करून दिली जाते.
पुष्परचना, चित्रकला, रंगकाम, मातीकाम, कागदकाम घेतले जाते. विविध विषयावर आधारित प्रकल्प, चित्र संकलन करण्यास देण्यात येते. स्टेज करेजसाठी कथाकथन, भाषण, गीतगायन, अभिनय, संवाद शिकविले जातात. त्यांचे सादरीकरण करण्यात येते.
समाजभान मुलांना यावे यासाठी सामाजिक आताच्या समस्यांवर आधारित उपक्रम राबविण्यात येतात. बेटी बचाओ बेटी पढाओ, वृक्ष लागवड- वृक्ष संवर्धन, पाणी स्वच्छता, पर्यावरण प्रदूषण, परिसर स्वच्छता, प्लॅस्टिक मुक्ती अभियान यावर आधारित स्पर्धा, उपक्रम घेण्यात येतात.
अशा सर्व विविध विषयांना स्पर्श करीत, समाजभान ठेऊन मुलांच्या विकासासाठी प्रगतीसाठी मुक्तांगण शाळेमध्ये प्रयत्न केले जातात.